'डॉक्टर, माझे डोळे अचानक लाल झालेत, चुरचुरतायेत त्यांची आग पण होतीये, आता तर उन पण नाहीये, तरीही डोळ्यात घाण येतीये, मी तर गॉगल पण लावतो...'
एक तरुण माझ्याकडे आला आणि घाई घाईने आपली व्यथा सांगू लागला. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यातली ही घटना. त्याच सगळं बोलण बरोबर होतं. पण उन नाही आणि गॉगल लावतो म्हणून म्हणून संसर्ग होणार नाही असं आजिबात नाही. डोळ्यांची निगा राखणं, त्यांची काळजी घेणं हे आपलच काम आहे. ते जरी आपण करत असलो तरी घाईगडबडीत योग्यरीतीने आपण काळजी घेतोच असं नाही. उन्हाळ्यातच डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो आणि एरवी तो होऊ शकत नाही, हा आपल्यामध्ये मोठा गैरसमज आहे. पावसाळ्यात जेव्हा पाऊस नसतो त्यावेळी दमट हवामानामुळे प्रचंड उकाडा असतो. दमट हवामान संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. सर्दी- पडसं, खोकला, ताप अशा आजारांबरोबरच दर वर्षी या दिवसांत डोळे येण्याचीही साथ पसरते. त्यामुळे पावासाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घेतली तर अशा किरकोळ त्रासांपासून आपण आपला नक्कीच बचाव करू शकतो.
पावसाळा सुरू होताच निसर्ग कात टाकतो, निसर्गात बदल होतो, तसाच त्याचा परीणाम आपल्यावरही होत असतो. चार महिन्यांचा उन्हाळा सहन करून आपण पावसाची नितांत वाट बघत असतो. पहिला पाऊस आला रे आला की, त्यात चिंब भिजण्याचा आनंद घेतो अन इथुनच डोळ्यांच्या संसर्गाला सुरवात होते. सध्याच्या वाढत्या प्रदुषणामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर पडणाऱ्या दोन-तीन पावसाच्या पाण्यात आम्लाचे प्रमाण खूप जास्त असतं, तसंच प्रदुषणांमुळं डोळ्यांच्या आरोग्याला घातक असलेले अनेक घटक या पाण्यात विरघळले असतात. हेच पाणी थेट आपल्या डोळ्यात जाते आणि संसर्गाला सुरवात होते.
हा संसर्ग म्हणजे कंन्जक्टीव्हायटीस... यालाच आपण डोळे येणे, असेही म्हणतो. डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर असलेल्या पारदर्शक आवरणाला संसर्ग होऊन डोळे लाल होणे, सतत पाणी येणे, चिपड येणे, डोळ्यांना खाज सुटणे, सकाळी उठल्यावर डोळे उघडता न येणे, पापण्यांवर सूज येणे, अंधूक दिसणे अशी विविध प्रकारची लक्षणे डोळ्यांचा आजार झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येतात
पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर किंवा इतरत्र अनेक ठिकाणी डबकी साचलेली असतात, त्यात वेगवेगळ्या संसर्गजन्य विषाणूंचे प्रमाण खुप असते. हेच विषाणू डोळ्यात गेल्याने या संसर्गाला सुरवात होते. पावसाळी हवेत नायट्रीक ऑक्साईड, सल्फर, नायट्रोजन डाय ऑक्साईड असे वेगवेगळे घटक मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे डोळ्यांची आग होणे, चुरचुरणे, पापण्या सुजणे, रक्तवाहिन्या सुजुन डोळे लाल होणे असे विविध संसर्ग डोळ्यांना होतात. त्यामुळे डोळ्यातून सतत घाण येण्याचे प्रमाणही वाढते. गाडीवर प्रवास करतानाही अचानक आपल्या डोळ्यात रस्त्यावरील पाणी जाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळेही संसर्ग होण्याचा धोका वाढतो. हा संसर्ग आपल्याला झालाच तर आपल्या कुटुंबियांसह मित्र मैत्रीणींना त्याची वेगाने लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण आपली काळजी घेणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात काय काळजी घ्यावी?
- डोळ्यात काही गेल्यास डोळे चोळू नयेत
- डोळे लाल असल्यास स्वच्छ पाण्याने धुवावेत
- सतत गॉगल किंवा चष्मा लावावा
- डोळ्यांना नेहमी स्वच्छ हातानेच स्पर्श करावा
- साचलेल्या पाण्यापासून स्वतःसह इतरांनाही दूर ठेवावे
- स्वच्छ टॉवेल, नॅपकीनचा वापर करावा
- डोक्यावर टोपी किंवा रेनकोटचा वापर करावा
- पावसाचे पाणी थेट डोळ्यात जाऊ देवू नये
डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?
- डोळे आल्यास काळ्या चष्म्याचा उपयोग करावा
- किमान 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे
- डोळ्याचे ड्रॉप्स, मलम वापरताना हात स्वच्छ धुवावे
- डोळ्यासाठी वापरलेले रुमाल गरम पाण्यात धुवावे
- डोळे आलेल्या व्यक्तीचे साहित्य इतरांनी वापरू नये
- डोळे आलेल्या व्यक्तीने गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये
- डोळे पूर्ण बरे होईपर्यंत कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर टाळावा
- व्हिटॅमिन युक्त आहार घ्यावा
- योग्य औषधोपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा