दरवर्षी विविध देशात नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये नेत्रदानाबाबत माहिती देण्यासाठी जागतिक पातळीवर 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये दृष्टिदान अर्थात नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे दान करून दुसऱ्याच्या जगातील अंधार दूर करण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे.
"हे जीवन सुंदर आहे... " गाण्याच्या या दोन ओळीतून जगाची सुंदरता व्यक्त होते. हीच ती सुंदरता आपण डोळ्यांनी अनुभवतो आणि मनात साठवून ठेवतो. ती शब्दबद्ध करण्याचे काम गाण्यात गीतकाराने केले आहे. अनेकदा आपण नयनरम्य आणि नेत्रसुखद असे शब्द सहज वापरतो पण या शब्दांमध्ये असलेले सामर्थ्य दृष्टी असणाऱ्यांना कदाचित सामान्य वाटत असेल पण ज्यांच्याजवळ ही दृष्टी नाही, त्यांच काय ? त्यांना मात्र हे सामर्थ्य अगम्य आणि अद्भुत आहे. जगातील प्रत्येक वस्तूचा प्रत्येक गोष्टीचा परिचय हा डोळ्यांमुळे होतो कोणतीही गोष्ट आपण पहिल्यांदा बघतो आणि ती डोळ्यात साठवून ठेवतो. या रंगीबिरंगी जगाचा आनंद आपण डोळ्यामुळेच घेऊ शकतो. डोळे बंद करून एखादे काम करा म्हटले, तर ते अशक्यचं. डोळे नाहीत, दृष्टी नाही याची कल्पना करणे देखील अवघड आहे. मात्र ज्यांच्या जगात खरोखरच अंधार आहेत त्यांचे आयुष्य किती अवघड आहे हे सांगणे देखील अतीअवघड आहे.
सध्याची आपली बदललेली जीवनशैली आणि अनियमित असलेली दिनचर्या प्रदूषण आणि मानसिक तणाव यामुळे अनेकांना डोळ्यांच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ज्येष्ठत्वाकडे झुकायला लागलो की पूर्वी डोळ्यांच्या तक्रारी समोर यायच्या. पण आता मात्र तसे नाही, या समस्या काहींना बालवयातच उद्भवतात, तर काहींना याचा त्रास वयाच्या मध्यातच उद्भवतो. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करणा-यासंयुक्त राष्ट्रसंघाच्या विश्व स्वास्थ्य संस्थेच्या म्हणण्यानुसार मोतीबिंदू आणि ग्लुकोमा याच्या बरोबरीने कार्नियाच्या (डोळ्यांमधील पडदा) आजारपणामुळेही अंधत्व येण्याचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षी विविध देशात नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये नेत्रदानाबाबत माहिती देण्यासाठी जागतिक पातळीवर 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये दृष्टिदान अर्थात नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे दान करून दुसऱ्याच्या जगातील अंधार दूर करण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे. या कामाला गती देणे आणि याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून, नेत्रदानासंदर्भात शपथ घेण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्याचे काम सुरू असले तरीही अद्याप एक मोठे आव्हान जगासमोर आहे. नेत्रहीन असल्याने अंधत्व असलेल्यांच्या आयुष्यात नेत्रदान करून प्रकाश पसरवण्याचे सत्कार्य करण्याचा उद्देश या दिवसाचा आहे.
नेत्रहीन असण्याची अनेक करण आहेत. अपघाताने दृष्टी गमावणा-यांच्यात लहान मुलांची संख्या मोठी आहे. तर काहींना जन्मताच अंधार वाट्याला येतो. रक्ताचा कर्करोग अर्थात ब्लड कॅन्सर सारख्या आजारांमुळे अनेकांना आपल्या दृष्टी सोबतच जीवदेखील गमवावा लागतो. डोळ्यांचे महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत आहेच, म्हणूनच त्यांची सुरक्षा करणे हे आपले सर्वात मोठे कर्तव्य आहे. स्वतःसाठी तर सगळेच विचार करतात, पण इतरांसाठी देखील विचार करून नवीन दिशा देण्याचे काम प्रत्येकानेच केले पाहिजे. जगातील अंधार दूर करणे अवघड नाही. प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदान केले तर हे कार्य देखील सोपे होईल. या जन्मात नेत्रदान केले तर पुढील जन्मात आपण आंधळे जन्माला येऊ या अंधविश्वासाला मुठ माती देण्याची आता गरज आहे. आपल्या एका सकारात्मक पावलाने एखाद्याचे आयुष्य रंगीत होऊन, जीवन खऱ्या अर्थाने सुंदर होणार आहे. चला तर शपथ घेऊया मरणोत्तर नेत्रदान करण्याची..! नेत्रहीन व्यक्तीचे आयुष्य बघितल्यावर डोळ्यांची गरज लक्षात येते त्यामुळे त्यांची निगा राखण्यासाठी खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- संतुलित आहार हा सर्वात मोठा घटक आहे. यात हिरव्या पालेभाज्या, अंडी, फळे आणि गाजर यांचा समावेश केला पाहिजे
- धुम्रपानामुळे द्रष्टीची अपरिमित हानी होते, त्यामुळे टाळलेलेच बरे
- सूर्याच्या प्रखर किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करायला हवे. गॉगल वापर करावा
- टीव्ही पाहताना अथवा संगणकावर काम करताना अँटी ग्लेअर चष्मा घातल्यास डोळ्यांचे नुकसान होत नाही
- अंधुक प्रकाशात वाचन टाळावे
- डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी योग्य नेत्रतज्ज्ञांकडून करावे
- कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर जास्त करू नये, तसेच लेन्स घालून झोपू नये
- जास्त वेळ संगणकावर काम करतात त्यांनी सतत काम न करता 20-20-20 हा फॉर्म्युला वापरावा, म्हणजे 20 मिनिटे संगणकावर काम, त्यानंतर 20 फूट अंतरावर 20 सेकंद बघणे, त्यानंतर पुन्हा संगणकावर काम
भारतात नेत्रदानाबाबत अद्यापही जागृत नाही. विविध संस्था आणि इस्पितळे, रुग्णालय यात पुरेश्या सोई सुविधांचा अभाव, तसेच डोळ्यांचे अपुरे उपचार, प्रशिक्षित तज्ज्ञ, सामाजिक आणि धार्मिक प्रश्न यामुळे येणारे अज्ञान यासह विविध कारणांमुळे देशात नेत्रदान होत नसल्याचे समोर आले आहे. नेत्रदानाची ही प्रक्रिया मृत्यूनंतर अगदी काही तासातच करावी लागते. त्यामुळे कोणतीही समस्या उद्भवत नाही. तसेच कोणताही त्रास देखील होत नाही. आपली मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा असली, तर जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन नोंद करता येते. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशात सुमारे 1.25 कोटी नागरिकांना अंधत्व आहे. त्यातील 30 लाख व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून तसेच नेत्र प्रत्यारोपण करून नवीन दृष्टी मिळू शकते. आपल्या देशाचा मृत्युदर बघितला तर दरवर्षी होणा-या मृत्यूची संख्या लक्षात घेता, तेवढे नेत्रदान झाले तर एका वर्षातच नेत्रहीन व्यक्तींना दृष्टी प्राप्त होईल. त्यामुळे चला आजच्या जागतिक दृष्टीदान दिनाला संकल्प करुया आणि प्रकाश पसरवून नेत्रहीन जीवनातील अंध:कार संपवूया..!