डोळे... देवाने दिलेला एक सुंदर अवयव. यामुळे विविधतेने नटलेली ही सुंदर सृष्टी बघणे आपल्याला सहज सोपे होते. पाना-फुलांवर पडलेले पावसाचे दवबिंदू अन त्यातून होणारा मोत्याचा आभास असेल... दुरून डोंगरावरून खळखळत वाहत येणारा धबधबा असेल किंवा रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली एखादी बाग असेल..! अशी अनेक सुंदर चित्रं डोळ्यात साठवता येतात.

या सुंदर चित्रांचा आस्वाद केवळ डोळ्यांमुळे घेता येतो. निसर्गातील मुक्त रंगांची उधळण आपल्या मनाला आनंद देऊन जाते आणि ही रंगीबेरंगी दुनिया आपण केवळ डोळ्यामुळेच अनुभवू शकतो. मानवाने प्रगती केली तसा त्या भौतिक सुखांचा शरीरावर विपरीत परिणाम देखील होत आहे. मात्र त्यातून योग्य उपाययोजना करून आपल्याला शाप वाटणाऱ्या गोष्टीही वरदान ठरू पाहत आहेत. संगणक आणि मोबाईल हा सध्याच्या युगातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपले आयुष्य याशिवाय अपुरे आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र या सगळ्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम देखील होत असतो. त्यासाठी योग्य वापर, आहार आणि काळजी अशी त्रिसूत्री वापरली, तर शाप ठरणाऱ्या गोष्टी वरदान ठरू शकतात. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आठ तासांहून अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करत आहे. त्यामुळे तरुण वर्गात डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप कमी प्रमाणात होते. परिणामी डोळ्यातील अश्रू पटल कोरडे होऊन डोळ्यात कोरडेपणा जाणवतो. डोळ्यांची आग होणे, थकवा जाणवणे, नजर कमी होणे आदी लक्षणे प्रामुख्याने दिसू लागतात. संगणकावर विशिष्ट अंतरावर सातत्याने नजर केंद्रित करून काम केले जाते यामुळे डोळ्यांमधील बाहुलीचे स्नायू थकतात आणि विविध विकार जडतात. संगणकाच्या अतिवापरामुळे डोळ्यांना होणाऱ्या या त्रासाला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, असे म्हणतात. संगणकासोबतच आता मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर होतोय. सतत मोबाइलचा वापर केल्याने देखील डोळे कोरडे पडतात. लहान मुलांमध्ये ऍलर्जी येते, त्याला स्प्रिंग कटार असे म्हणतात. यामध्ये डोळे लाल होऊन खाजतात आणि खाजवल्यामुळे ते आणखीन लाल होतात. यासाठी नेत्र तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डोळ्यांना कोरडेपणा आणखीन एका साधनामुळे येऊ शकतो ते म्हणजे एसी, अर्थात वातानुकूलित यंत्रणा. सातत्याने एसीमध्ये बसल्याने डोळे लवकर कोरडे होतात. त्यांना थकवा येतो. अश्रू व्यवस्थित तयार न झाल्याने डोळे चुरचुरतात. यासोबतच वाढते तपमान, कामाची अस्वच्छ जागा, धूळ-धूर, परफ्युम, सौंदर्यप्रसाधने, परागकण, झाडे, बुरशी यामुळे देखील डोळ्यांना इजा होऊ शकते. उष्माघात, शरीरात पाण्याची कमतरता, ताप आणि डास यामुळे होणाऱ्या आजारांचा डोळ्यांवर परिणाम होतो. यामुळे डोळे कोरडे पडणे, लाल होणे किंवा डोळ्यांना थकवा जाणवणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

या सगळ्यावर उपाय म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी डोळ्यांची नियमित काळजी घेतली पाहिजे यासाठीच योग्य आहाराचे सेवन महत्त्वाचे आहे. डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी विटामिन के युक्त पदार्थ म्हणजे बदाम, दूध, हिरव्या भाज्या अधिक प्रमाणात खाव्यात. ओमेगा थ्री, फॅटी ऍसिड असलेले पदार्थ आपल्याला अशा आजारांपासून वाचवण्यासाठी मदत करतात,.सोबतच नियमित पाणी पिणे आहारात फळे हिरव्या भाज्या यांचा वापर करणे जंक फूड खाण टाळणे आवश्यकच.

दिवसातून दोन-तीन तासाहून अधिक काळ संगणकासमोर बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी किमान दर अर्ध्या तासांनी तीन ते चार मिनिटे डोळे बंद करून विश्रांती घ्यावी. हे शक्य नसेल तर खिडकीमधून लांबवर पहावे या काळात मोबाईल अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे गॅजेट्स पाहू नयेत. तसेच काम करताना डोळ्यांची उघडझाप करावी. एसीची हवा थेट आपल्या चेहऱ्यावर येणार नाही, याची काळजी घ्यावी. अर्थात एसीचा झोत चेहऱ्याकडे येत असल्यास त्याची दिशा बदलून घ्यावी. मोबाईल-संगणक यांच्या स्क्रीनमध्ये आणि डोळ्यात अंतर ठेवावे. तसेच हे अंतर बदलते राहील याची काळजी घ्यावी. तरीही डोळे कोरडे होत असल्यास नेत्र तज्ञांचा सल्ला घेऊन आय ड्रॉपचा वापर करावा.

लहान मुले आणि मोबाईल हे आता न सुटणारे समीकरण झाले आहे. अगदी तान्ह्या बाळाला देखील मोबाईल दाखवला जातो. आजकाल मुलांना जेवू घालताना तसेच त्यांना शांत करण्यासाठी पालक सहजपणे मोबाईलचा वापर करतात, असे निदर्शनास आले आहे. लहान मुलांना जेवताना विविध गाणी गोष्टी मोबाईलवर लावून दिल्या जातात. त्यामुळे मुलेदेखील मोबाईलचां वापर करण्यास धजावतात. मोबाईलचा अतिवापर लहान मुलांसाठी धोकादायक आहे, हे प्रथमतः पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. यामुळे मुख्यत्वे डोळ्यांचे नुकसान तर होतेच, पण सोबतच मुलांमध्ये एककेंद्रीपणा, फोबिया, शारीरिक विकास खुंटणे, लहान वयात चष्मा लागणे, डोळ्यांची दृष्टी क्षमता कमी होणे, व्यायाम न झाल्याने शरीराचे इतर नुकसान होणे आधी बाबी घडतात.

सवयी'ने जपा दृष्टी..!

प्रत्येक लहान मुलाची वयाच्या तिसऱ्या वर्षी डोळ्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यातील धोका वेळीच लक्षात येऊन त्यावर उपाययोजना करता येतात. यासोबतच मुलांना मैदानी खेळ आणि इतर त्यांच्या कलागुणांना वाढ करण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. सध्या मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीचा वापर सर्रास होताना दिसतोय. लहान घरांमध्ये मोठ्या स्क्रीनचे टीव्ही लावले जातात. त्यामुळे त्याचा उजेड डोळ्यांवर पडतो आणि त्याचा दूरगामी परिणाम डोळ्यांवर होतो. मोठ्या स्क्रीनवर पाहतांना थेट प्रकाश पडत असल्यास डोळे आणि स्क्रीन यामध्ये किमान तीन मीटरचे अंतर असणे गरजेचे आहे. अंधार करून टीव्ही बघू नये. त्यामुळे डोळे कोरडे पडण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच टीव्ही अथवा मोबाईल अंधारात वापरू नये. छोट्या छोट्या सवयी अंगी बाळगल्या तर अनेक आजारांपासून आपल्याला सहज दूर राहता येईल. चला तर मग या मोबाईल आणि संगणकाच्या युगात काही चांगल्या सवयी देखील अंगी बाळगू, त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी संगणक आणि मोबाईल हे शाप न ठरता वरदान ठरतील..!

  BOOK NOW CALL NOW  CHAT