दिवाळी.. म्हटल्यावर सगळीकडेच धामधूम सुरू होते. प्रकाशाचा सण असल्याने सर्वत्रच रोषणाईचे दिवे, फटाके या सगळ्याचा धडकाच आपल्याला दिसतो. आपली दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतच असतो. मात्र दिवाळी हा जसा प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो, तसाच या सणात डोळ्यांचा इजा होण्याचे प्रमाणही वाढलेले असते, याचाही आपण प्रत्येकानेच विचार करायला हवा.
दिवाळी हा जसा प्रकाशाचा सण आहे. तसाच तो आरोग्याचा देखील सण आहे. अभ्यंगस्नानाच्या माध्यमातून आपण आपल्या त्वचेचे आणि शरीराचे आरोग्य सांभाळतो. त्याचप्रमाणे हा सण साजरा करताना आपण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांच्या डोळ्यांचे आरोग्य देखील सांभाळले पाहिजे. म्हणूनच दिवाळीमध्ये फटाके उडवताना डोळ्यांची विशेष काळजी घेणे कधीही श्रेयस्कर ठरणारेच आहे.
दिवाळीत फटाके फोडण्याचा आनंद घेताना डोळ्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शक्यतो जास्त आवाजाचे फटाके फोडू नयेत, तर रोषणाई असलेले फटाके फोडताना डोळ्यांची काळजी घ्यावी. या प्रकारचे फटाके उडवताना तीव्र प्रकाशामुळे किंवा फटाकाच्या तीव्रतेमुळे जमीनीवरील धुळीचे कण उडाल्यामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. असे घडल्यास डोळे चोळू नयेत, तत्काळ डोळ्यांवर पाणी मारावे आणि आपल्या नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
फटाके उडवताना शक्य झाल्यास गॉगल वापरावेत. लहान मुलांनीही फटाके उडवताना मोठ्यांच्या उपस्थितीतच फटाके उडवावेत. लहान मुलांनी एकट्याने फटाके उडवणे धोकादायक ठरू शकते. त्यातुन होणारे नुकसान हे कधीही भरून न येणारे असू शकते. झाड, भुईचक्र, फुलबाजे यासह विविध फटाके उडवतांना शरीरापासून दूर ठेवावेत. कोणताही फटाका हातात उडवणे चुकीचेच आहे. कारण त्यातून हातासोबतच डोळ्याला देखील मोठ्या प्रमाणात इजा होऊ शकते. डोळा हा अतिशय नाजूक अवयव असल्याने त्याची काळजी देखील तितकीच घ्यावी लागते. त्यामुळे प्रत्येकाने फटाके उडवताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. असे केल्याने प्रकाशाचा सण हा आपल्यासाठी आनंदाचा ठरेलच तसेच खऱ्या अर्थाने तो आपल्यासाठी प्रकाशमान होईल. सर्वांना दिवाळीच्या मंगलमय आणि प्रकाशमय शुभेच्छा..!
फटाके फोडताना काळजी न घेतल्यामुळे डोळ्यांना झालेली इजा.
काय काळजी घ्यावी ?
- डोळ्यांना इजा झाल्यास ते चोळू नयेत.
- लहानांनी मोठ्यांच्या उपस्थितीतच फटाके फोडावेत.
- गॉगल लावून फटाके उडवावेत.
- हातात फटाके उडवू नयेत.
- फटाके उडवताना फटाक्यात आणि आपल्यात योग्य ते अंतर ठेवावे.
- मातीत किंवा धुळीत फटाके उडवू नयेत.